ॲड. संदीप थोरात
प्रत्येक शहरात अनेक धर्मिय लोक राहत असतात. त्यामुळे त्या-त्या धर्माची प्रार्थना स्थळे ही त्या शहराची एक ओळख असते. परंतू ही बाब त्या-त्या धर्मियांपुर्तीच मर्यादीत असते. काही प्राचीन लेण्या वा पर्यटन स्थळेही त्या शहराची सांस्कृतिक ओळख असते. मात्र या ओळखींनाही काही मर्यादा असतातच, कारण त्या सर्वव्यापी नसतात. अशा वेळी सर्वव्यापी व खऱ्या अर्थाने सार्वत्रिक अशा नव्या नागरिक स्थळांची निर्मिती करणे आवश्यक असते. याच विचारातून अंबाजोगाईतील काही सुजान नागरिकांनी एकत्र येऊन संघर्षभूमीवर एका नव्या पर्यटन व प्रेरणा स्थळाची निर्मिती केली आहे.
प्रत्येक अंबाजोगाईकराला आपलेसे वाटेल असे हे नवे स्थळ आहे. जात, धर्म, वंश, प्रदेश या भेदभाव करणाऱ्या ओळखींना दूर सारून सर्वांना भारतीय या एकच ओळखीने जोडणारे हे शिल्पकलाकृती स्थळ आहे. आपल्यातील एकत्मता व बंधुभाव वृद्धींगत करणारे हे नवे स्थळ आहे. अंबाजोगाई शहराची शान वाढविणारे हे स्थळ म्हणजे – ‘ संविधान उद्देशिका शिल्प ‘होय !
आठ फुटाची उंची असणारी ही शिल्पकलाकृती शहराच्या नावलौकीकाच्या उंचीत नक्की भर टाकेल. जबाबदार भारतीय नागरिकांनी एकदा अवर्जून भेट द्यावी म्हणजे त्यांना या स्थळाचे महत्व कळेल ! लोकसहभागातून निर्मिती व लोकांच्याच हस्ते संविधान दिनी लोकार्पण हे या निर्मितीचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.