धर्मापुरी जवळ भीषण अपघात : दोन मजुरांचा जागीच मृत्यु

टीम AM : धर्मापुरी जवळ एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. धर्मापुरीहुन भोजनकवाडीकडे विजेचे पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मयत दोन्ही मजुर भोजनकवाडी येथील रहिवासी असून ही दुर्घटना मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भोजनकवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, मंगळवार दि.16 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मापुरी येथून विजेचे पोल घेऊन ट्रॅक्टर भोजनकवाडीकडे निघाले असता, धर्मापुरी जवळील पुलावर ट्रॅक्टर पलटी झाले. यात भोजनकवाडी येथील दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. प्रल्हाद वैजनाथ फड [वय – 34], भाऊसाहेब माणिक केदार [वय – 37] अशी मयत झालेल्या मजुरांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करित आहेत.