‘राजकारण गेलं मिशीत’ : मकरंद अनासपुरे सोबत झळकणार बाळू मुकदम, 19 एप्रिलला होणार प्रदर्शित

टीम AM : महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणारा जेष्ठ ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे ह्यांच्या ‘अग अग मिशी’ ह्या कथेवर आधारीत ‘राजकारण गेलं मिशीत’ हा बकुळी क्रिएशनची निर्मिती असलेला आणि मकरंद अनासपुरे यांचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येत्या 19 एप्रिलपासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अंबाजोगाईतील बाळू मुकदम यांच्यासह बीड जिल्ह्यातील सहा कलाकार झळकणार आहेत. 

सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये प्रेक्षकांना मनसोक्त हसवून विचार करायला लावणारा हा एक सुंदर मार्मिक चित्रपट आहे. या अगोदर मकरंद अनासपुरे यांचे राजकीय पार्श्वभूमी असलेले ‘खुर्ची सम्राट’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ यासारखे राजकीय विनोदी चित्रपट अतिशय गाजले. तसाच उत्कृष्ट प्रतिसाद याही चित्रपटाला मिळेल याची खात्री मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या टीमने व्यक्त केलेली आहे. 

या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने असून छाया दिग्दर्शक सुरेश देशमाने, संगीत अतुल दिवे, कथाविस्तार योगेश शिरसाठ, सुमित तौर, पटकथा – संवाद योगेश शिरसाठ, संकलन अनंत कामथ आहेत. तर या चित्रपटातील कलाकार मकरंद अनासपुरे सोबत प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनित भोंडे, हरीश तिवारी, छोटू विठ्ठल, श्वेता पारखे, उन्नती कांबळे, रेश्मा राठोड, सुनील डोंगरे, शैलेश कोरडे हे आहेत. तर येत्या 19 एप्रिलला बघायला विसरू नका ‘राजकारण गेलं मिशीत’ आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.