अंबाजोगाईतील चौकांत एकही नाही महापुरुषांचा पुतळा : सुशोभीकरणासाठी डिजिटल फ्रेमचा आधार

जयंतीदिनी चौकांच्या पाटीला हार घालून होतंय अभिवादन 

टीम AM : मराठवाड्याची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक राजधानी संबोधल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरात महापुरुषांच्या चौकांची अवस्था तर दयनीयचं आहे तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून एकही महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला नसल्याने चौकांच्या सुशोभीकरणासाठी अनुयायांना डिजिटल फ्रेमचा आधार घ्यावा लागत आहे. महापुरुषांच्या जयंतीदिनी तर चौकांत फोटो ठेऊन किंवा चौकातील पाट्यांनाच हार घालून अभिवादन करावे लागते. अंबाजोगाई शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आता शहरातही महापुरुषांची पुतळे उभारली जावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महापुरुषांची पुतळे प्रेरणादायी असतात. त्यामुळेच प्रत्येक देशात त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण व्हावे, यासाठी स्मारक, पुतळे उभारले जातात. भारतात आणि राज्यातील प्रत्येक शहरात महापुरुषांची पुतळे चौकाचौकात ऐटीत उभारलेले दिसतात. या शहरातील पुतळ्यांकडे पाहिल्यानंतर निश्चितच प्रत्येकाच्या मनात इतिहासाची पाने उलगडली जातात. त्यासाठी प्रत्येक शहरातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि महापुरुषांचे अनुयायी पुतळे उभारण्यासाठी आग्रही असतात. परंतू, अंबाजोगाई शहर याला अपवाद आहे. 

अंबाजोगाई शहरात गेल्या कित्येक ‌‌‌वर्षांपासून एकही महापुरुषांचा पुतळा उभारला गेला नाही. दुसरीकडे महापुरुषांच्या बहुतांश चौकांचे सुशोभीकरण हे ‌व्यक्तीगत पुढाकारातून आणि लोकसहभागातून करण्यात आले आहे. निश्चितच लोकप्रतिनिधींसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. 

चौकांची पुनर्बांधणी करण्याची गरज

अंबाजोगाई शहरात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसह अन्य ‌‌‌महापुरुषांच्या नावाने मध्यवर्ती ठिकाणी चौक आहेत. या चौकांची केवळ जयंतीदिनीच देखभाल होते. यातील बऱ्याच चौकांची उभारणी लोकसहभागातून करण्यात आली असल्याने निधीअभावी चौकांचा शुशोभिकरणाचा आराखडा साजेसा झाला नाही. त्यामुळे या चौकांची पुनर्बांधणी करुन त्या ठिकाणी महापुरुषांची पुतळे उभारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. चौकांचे सुशोभीकरण आणि महापुरुषांची पुतळे उभारली गेल्यास निश्चितच शहराच्या वैभवात भर पडेल, अशी भावना महापुरुषांचे अनुयायी व्यक्त करित आहेत.