‘ईद मुबारक’ : अंबाजोगाईत रमजान ईद उत्साहात साजरी 

टीम AM : अंबाजोगाई शहरांसह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात गुरुवारी साजरी करण्यात आली. रमजानमध्ये महिनाभर मुस्लिम बांधव उपवास धरतात. शेवटच्‍या 10 उपवासादरम्‍यान सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या दरम्यान कपडे, सोने, सुकामेवा खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडते. यंदा रमजान महिन्याच्या निमित्ताने शहरातील बाजारात महिन्याभरात लाखो रुपयांची उलाढाल झाल्‍याचे सांगण्यात आले. 

अंबाजोगाईत ईदच्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता शहरांतील दोन्ही ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. त्‍यानंतर मशीदच्‍या इमामकडून सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. प्रार्थनेनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील दोन्ही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छानंतर मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देत सर्वांनीच शिरखुर्मा, गुलगुले याचा आस्वाद घेतला. अंबाजोगाई शहरातील ईदची ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने चालू आहे. रमजान ईदच्या दिवशी हिंदू – मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सामाजिक सलोखा जपत मोठ्या उत्साहात ईद साजरी करतात.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एप्रिल महिन्यात रमजान ईद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने अंबाजोगाई पोलिस प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजही अंबाजोगाई शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिस बांधवांनी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.