टीम AM : हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, अंबाजोगाई शहरांसह परिसरात बुधवारी आणि गुरुवारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, बुधवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.
आज दिनांक 11 एप्रिल रोजीही दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अंबाजोगाई शहरांसह तालुक्यात पावसाने झोडपले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धारूर तालुक्यातील सोनिमोहा, आंबेवडगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान झाले आहे.
झाडावर पडली वीज
बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव या गावी झाडावर वीज पडली. वीज पडताच झाडाने पेट घेतला, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.