टीम AM : राज्याच्या काही भागात उन्हाचे चटके जाणवत असताना पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ – उतार होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज अहमदनगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.