टीम AM : उदगीर – निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि.10) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्यप्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार [एमपी 09 डीई 5227] वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून येणारा ट्रक [एमएच 28 जे 7365] आणि कारची जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यु झाला.
अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने कार बाजूला काढण्यात आली. यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव डोके व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.