टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरापासून जवळ असलेल्या साकुड – मांडवा परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, साकुड – मांडवा परिसरात एका शेतकऱ्याला रात्री बिबट्या दिसून आला. त्या शेतकऱ्याने गावातील ग्रामस्थांना याची खबर दिली. गावातील ग्रामस्थांनी तातडीने जमा होऊन बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी पावले उचलली. यात काही जणांनी हलगीही वाजवली. गावातील ग्रामस्थांचा आवाज ऐकून त्या ठिकाणाहून बिबट्यानं पळ काढला, अशी माहिती मिळाली आहे.
सतर्कता बाळगण्याचे आवाहन
दरम्यान, साकुड – मांडवा परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन अधिकारी कस्तुरे यांच्याशी संपर्क साधला असता परिसरातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.