टीम AM : राज्यातील शेतकरी अनेकदा आपली जमीन कमी जाणवल्यास, सरकारी मोजणी करतात. मात्र, यापूर्वी शेतकऱ्यांना मोजणी केलेल्या जमिनीची ‘क’ प्रत मिळवण्यासासाठी अनेक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते.
मात्र, आता राज्य सरकारने जमीन मोजणी करणाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ‘ई – मोजणी 2.0’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अचूक माहिती मिळण्यासह, जमिन मोजणीचे (Land Survey) नकाशे अक्षांक्ष, रेखांशासह ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला राज्यातील 106 तालुक्यांमध्ये या ‘ई – मोजणी 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे सुरू आहेत. चालू वर्ष अखेरपर्यंत ही ‘ई – मोजणी 2.0’ योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा भूमी अभिलेख विभागाचा मानस आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी केल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. त्यांना मोबाईलवरच हे जमीन मोजणी नकाशे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.