टीम AM : महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार, अशी माहिती ज्योती मेटे यांनी एका वृतवाहिनीशी बोलताना दिली.
महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. शरद पवारांसोबत बैठकाही झाल्या होत्या. शेवटी मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष उमेदवार म्हणून परिणामकारक ठरू शकतील, असं जाणकारांचे मत आहे. आता ज्योती मेटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे आणि मेटे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.