लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !

टीम AM : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण 2004, 2009, 2014, आणि 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची नोंदणी झाली. 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 928 महिला असे प्रमाण होते. सन 2014 मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 889 महिला इतके होते. सन 2019 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 911 महिला असे प्रमाण होते. 2024 मध्ये 1 हजार पुरुषांमागे 923 महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

स्वीप अभियान

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, ‘स्‍वीप’ (SVEEP – Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला – संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे.

एकूण मतदार

2019 मध्ये सेवा मतदार धरुन 8 कोटी 86 लाख 76 हजार 946 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 64 लाख 28 हजार 348 पुरुष मतदार आहेत. तर 4 कोटी 22 लाख 79 हजार 192 महिला मतदार आणि 2 हजार 406 तृतीयपंथी मतदार होते. 2024 मध्ये 5 एप्रिल 2024 नुसार एकूण 9 कोटी 26 लाख 37 हजार 230 एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 86 लाख 4 हजार 798 पुरुष मतदार आहेत. तर 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 महिला मतदार आणि 5 हजार 618 तृतीयपंथी मतदार आहेत.