बीडमध्ये मुंडे विरुद्ध सोनवणे : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

टीम AM : शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. बीडमधून शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मुंडे विरुद्ध सोनवणे अशी लढत बीड जिल्ह्यात होणार आहे. 

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंच्या बहीण प्रितम मुंडे ह्या बीडच्या दोनवेळच्या खासदार आहेत. तरीही पक्षाने त्यांचं तिकीट कापून पंकजांना उमेदवारी दिली.

पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाईल, असं सांगितलं जात होतं. परंतू, बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सोनवणे यांनी आठवड्याभरापूर्वी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. बजरंग सोनवणे यांना 2019 मध्ये राष्ट्रवादीने  निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. परंतू, त्यांचा प्रितम मुंडेंनी पराभव केला होता. आता सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होणार आहे.