टीम AM : बीड लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गाडी केज येथे मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी अडविली होती. ही घटना ताजी असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील राडीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांनी खा. प्रितम मुंडे यांना ‘चले जाव’ चा नारा देत जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे गावातील परिसर दणाणून गेला होता.
बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ खा. प्रितम मुंडे या परळी मतदारसंघात मतदारांशी संवाद साधत आहेत. काल दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी प्रितम मुंडे या राडी गावात मतदारांशी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, मुंडे या गावात आल्याची कुणकुण लागताच मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी मुंडे यांच्या गाडीसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘चले जाव, चले जाव, आरक्षण विरोधक चले जाव’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी काही काळ वातावरण चांगलेच तापविले. दरम्यान, यावेळी अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना समज दिली आणि काही वेळानंतर वातावरण निवळले. नंतर खा. मुंडे या पुढील गावी प्रचारासाठी निघून गेल्या, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. असे असले तरी लोकसभेच्या या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र चांगलाच तापत आहे.