टीम AM : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. येत्या 26 एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘उधळीन जीव…’ या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.