टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अंबासाखर कारखान्यापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटीजवळ एसटी बसचा आणि दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात मायलेकराचा समावेश आहे. हा अपघात आज दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबासाखर कारखान्याजवळ वाघाळा पाटी येथे एसटी महामंडळाच्या लातूर – संभाजीनगर बसचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून यात मायलेकरांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची सेवालाल पंडित राठोड [वय – 21], दिपाली सुनील जाधव [वय – 20] आणि त्रिशा अशी नावं आहेत. मृत्यू झालेले बिटरगाव तांडा आणि राडी तांडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सेवालाल पंडित यांचे अवघे एक महिन्याने लग्न होणार होते. लग्नासाठी बस्ता बांधून बहिण आणि भाचीसोबत सेवालाल दुचाकीवरून जात होते. यातच त्यांचा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करित आहेत.