टीम AM : लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये कौटुंबिक विषयासह अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा झाली.
याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्यासोबत श्रीमती गयाबाई कऱ्हाड, भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, अविनाश तळणीकर, दिलीप काळे, अनंत लोमटे, कमलाकर कोपले, गणेश कऱ्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सत्यजित सिरसाट, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक खंडू गोरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या कौटुंबिक भेटीदरम्यान पंकजा मुंडे व राजकिशोर मोदी यांच्यात लोकसभा निवडणुकीवर यथासांग चर्चा झाली. चर्चेदरम्यान पंकजा यांनी राजकिशोर मोदी यांना लोकसभेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आपल्या पक्षाचे सर्व सहकारी बांधव यांना देखिल सोबत घेऊन मदत करावी, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी याप्रसंगी केली. सध्या बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील सर्व राजकीय नेते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, प्रमुख डॉक्टर आदींच्या भेटीगाठी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर प्रत्यक्ष सर्व ठिकाणच्या मतदारांशी तथा नागरिकांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान राजकिशोर मोदी यांनी आपण व आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातून जास्तीत जास्त मतांची लीड देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी राजकिशोर मोदी यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.