टीम AM : राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानानं चाळीशी पार केली आहे. राज्यात काल सर्वाधिक 42 पूर्णांक 8 अंश सेल्सियस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथं 42 तर जळगाव इथं 41 पूर्णांक 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, बुलडाणा, यवतमाळ आदी शहरातही पारा चाळीस अंशाच्या वर पोहोचला आहे.
मराठवाड्यात परभणी इथं सर्वाधिक 41 पूर्णांक 2 अंश सेल्सियस तापमान असून त्याखालोखाल नांदेड इथं 40 पूर्णांक 2, बीड इथं 40 पूर्णांक 1 तर छत्रपती संभाजीनगर इथं 39 पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
स्वत:ची काळजी घ्यावी
राज्यात गेल्यावर्षी अनेकजण उष्णघाताचे बळी ठरले आहेत. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे आणि तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने उष्णघात होऊ शकतो.