भीषण अपघात : सातेफळ जवळ मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. अंबासाखर कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सातेफळ फाट्याजवळ मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना बुधवार दि. 27 मार्च रोजी सायंकाळी घडली. या झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्य तर एक जण जखमी झाला आहे. सुशांत सुनिल ठाकूर [वय – 23, पाटोदा, म.] अंबाजोगाई व बालाजी भुजबळ [वय – 30, रा. जोडजवळा, जिल्हा लातूर] असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत 

अंबासाखर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्याजवळ मोटारसायकल क्रमांक एमएच – 11सीयु 2758 आणि एमएच – 24 बीएस 9183 यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की, दोन्ही मोटारसायकलींच्या हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः टुकडे टुकडे झाले होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील कुंबेफळ, सातेफळ, ममदापुर, पाटोदा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू, अपघातातील दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. 

लग्न होऊन झाले होते 10 महिने

अंबाजोगाई तालुक्‍यातील पाटोदा (म.) हे सुशांत ठाकूर याचे आजोळ असून तो चनई येथील रहिवासी आहे. सुशांत याचे मे 2023 रोजी ममदापुर [पा.] येथील मुलीसोबत लग्न झालेलं आहे. अगदी लग्न होऊन 10 महिने झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांत ठाकूर हा त्याच्या मोटारसायकलवर बसून अंबाजोगाईकडे जात होता. याच दरम्यान बालाजी भुजबळ व शिवहर भुजबळ हे अंबाजोगाईहुन त्यांच्या मोटारसायकलवर जोडजवळा या गावी जात असताना सातेफळ फाट्यावर समोरासमोर अपघाताची घटना घडली आहे.