मराठा आरक्षण : पंकजा मुंडेंची गाडी अडविली : पोलीसांचा सौम्य लाठीमार

टीम AM : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. ही घटना ताजी असतानाच आज पंकजा मुंडे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज मतदारसंघात दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. यावेळी पोलिसांनी आंदोलकावर सौम्य लाठीमार केला. पोलीस संरक्षणात मुंडे यांची गाडी बाहेर काढून देण्यात आली.

बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे या गेल्या आठवडाभरापासून प्रचाराला लागल्या आहेत. बुधवारी केज तालुक्यातील दौऱ्यावर असताना पावनधाम येथील अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या.

पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्ते जमा झाले, रस्त्यावर गाडी अडवत या आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलन केले. यावेळी आंदोलक ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.