गणेश जाधव
टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील रेल्वेस्थानकावर जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून करण्यात येत आहे. वेळोवेळी लेखी निवेदने देऊनही या मागणीला यश येत नसल्याने नागरिकांचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला असून प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. खा. प्रितम मुंडे यांनी रेल्वे प्रश्नासंदर्भात घाटनांदूरकरांची केवळ अश्वासनावरच बोळवण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील तरुणांनी जोपर्यंत जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
खा. प्रितम मुंडे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेऊन याबाबतीत निवेदन सादर केले होते. दीड वर्ष उलटूनही येथील रेल्वेस्थानकावर जलदगतीने धावणाऱ्या रेल्वेगाड्या थांबत नसल्याने खा. मुंडे यांचे निवेदन रेल्वे बोर्डात धूळखात पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच खा. मुंडेंच्या शब्दाला रेल्वे बोर्डात काडीची किंमत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले आहे.
घाटनांदूरचे व्यावसायिक महत्व कमी करण्यासाठी येथील रेल्वेस्थानकावर जलदगती रेल्वेगाड्यांना थांबा मिळू द्यायचा नाही. हाच मुंडे कुटुंबियांचा राजकीय डावपेच आहे. अशा चर्चेला आता उधाण आले आहे. घाटनांदूर रेल्वेस्थानक हे प्रवासी आणि व्यापारीदृष्ट्या अतिशय सोयीचे व महत्वाचे स्थानक आहे. या मार्गाहून जाणाऱ्या जलदगती गाड्यांना येथे थांबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जलद रेल्वे गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा मिळाला तर, अंबाजोगाई शहारासह घाटनांदूर परिसरातील तीस ते चाळीस खेडे, गावातील प्रवासी नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच अंबाजोगाईसह परिसरातील माल खरेदीच्या निमित्ताने हैद्राबाद, बैंगलोर आणि मुंबईला जाणाऱ्या व्यावसायिकांसाठी घाटनांदूर रेल्वेस्थानक हे एक मध्यवर्ती रेल्वेस्थानक आहे. अंबाजोगाई शहर तसेच तालुक्यातील इतर गावांतून तिरुपती येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठीसुद्धा घाटनांदूर रेल्वे स्थानक अधिक सोयीचे आहे. घाटनांदूर येथील रेल्वेस्थानकावर जलदगती गाड्यांना थांबा देण्यात यावा, ही मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून येथील नागरिकांकडून आमदार आणि खासदारांकडे केली जात आहे. मात्र, लोकप्रतिनिधी वारंवार या क्षुल्लक प्रश्नाकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांची थट्टा उडवत आहेत.
पूर्वीच्या नांदेड – बंगलोर, औरंगाबाद – हैद्राबाद आणि नुकत्याच सुरू झालेल्या नांदेड – हुबळी, नांदेड – तिरुपती या दोन जलदगती रेल्वेगाड्यांना येथे थांबा नसल्याने तळं उशाला ; पण कोरड घशाला अशी प्रवाशांची अवस्था झाली आहे. कोविड – 19 चे कारण देऊन एकमेव नांदेड – बैंगलोर (जलदगती) असलेल्या गाडीचा थांबा सुद्धा एका वर्षातच रद्द करण्यात आला. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशी नागरिक हताश झाले आहेत.
◾’नांदेड – बंगलोर एकमेव जलदगती गाडी येथे थांबत होती, त्यातून महिन्याकाठी लाखों रुपयांचे उत्पन्न रेल्वे खात्याला मिळत असूनही गाडीचा थांबा रद्द का करण्यात आला ? खा. मुंडे यांनी याचे उत्तर जनतेला द्यावे अन्यथा या कुचंबनेची जनता परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.’ – बालाजी सालपे
◾’घाटनांदूरच्या रेल्वेप्रश्नासाठी खासदार प्रितम मुंडे यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून गेली दहा वर्षे त्यांचे उंबरे झिजवले. परंतू, त्यांनी घाटनांदूरकरांना दिलेला शब्द पाळला नाही, यावरून घाटनांदूरकरांना मतदानापुरतं गृहीत धरलं जातं. त्यामुळे आम्ही तरुणांनी मिळून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.’ – आशिष पिंपळे
लाखोंची उलाढाल होणारे रेल्वेस्थानक पडले ओसाड….
पूर्वीची पॅसेंजर पण सध्या जलदगतीत रूपांतरित झालेल्या औरंगाबाद – हैद्राबाद तसेच नांदेड – बँगलोर जलदगती गाडीचा थांबा रद्द झाल्याने महिन्याअखेर लाखों रुपयांचे उत्पन्न देणारे घाटनांदूर रेल्वेस्थानकाचे वैभव लयास जाऊन ते निर्मनुष्य झाल्याचे भयंकर चित्र निर्माण झाले आहे. खा. प्रितम मुंडे मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न दुर्लक्ष करत असल्याचे घाटनांदूरकरांना प्रकर्षाने जाणवत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सामान्य घाटनांदूरकरांचा एक प्रश्न सुद्धा खासदार म्हणून सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत याची किंमत मुंडे कुटुंबाला मोजावी लागणार हे मात्र निश्चित आहे.’