लिफ्ट मागितली आणि गमावला जीव : टॅंकर – दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

टीम AM : बीड जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. बीडहून नगरकडे जाणाऱ्या डीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बीड – नगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील डोईठाण जवळील शिवनेरी चौकात घडली. या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने हे ठिकाण अपघाताचे क्षेत्र बनले आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील सकुंडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगाव मार्गे गावाकडे जात असताना धामणगाव येथे डोईठाण येथील अनिल विठ्ठल तरटे [वय -19] या युवकाने लिफ्ट मागितली. गायकवाड यांनी त्याला लिफ्ट दिली. 

दोघेही दुचाकीवरून जात असताना सायंकाळी चारच्या दरम्यान बीड येथे डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेला टँकरची [एमएच 16 सीसी 7631] जोरात धडक दुचाकीला बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडकून पळून जात असलेल्या टँकर चालकाला कडा चौकीच्या पोलिसांनी टँकरसह ताब्यात घेतले आहे. अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले.