लोकसभा निवडणूकीसाठी कामाला लागा : जरांगे पाटील यांनी ‘या’ दिल्या सूचना, वाचा… 

टीम AM : लोकसभा निवडणूकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एकच उमेदवार उभा करावा, असं आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

आपण स्वतः निवडणूकीत सहभागी होणार नाही. कोणत्याही पक्षाचा जो उमेदवार सगेसोयरे कायद्याला पाठिंबा देईल त्याच्याकडून करारनामा घेऊन त्याला पाठिंबा द्यावा किंवा जिल्ह्यातून सर्व जाती धर्मांतून एकच उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा, असं ते म्हणाले.

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं दहा टक्के आरक्षण हे आरक्षणाच्या मूळ 10 टक्क्यांच्या आत द्यावं, असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी गावात जाऊन मराठा समाजासोबत बैठक घ्यावी, उमेदवार कोण द्यायचा हे येत्या 30 तारखेपर्यंत निश्चित करावं, असं जरांगे पाटील म्हणाले.