टीम AM : होळी तसंच धुलिवंदन सोहळ्यासाठी सर्वत्र बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. होळी सणासाठी अंबाजोगाई शहरातील स्थानिक बाजारपेठांमध्ये शेणाच्या गोवऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्यासह धुळवड खेळण्यासाठी नाना तऱ्हेचे रंग, पिचकाऱ्या आणि इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. होळी – धुळवडीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान या सणांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड न करण्याचं तसंच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पर्यावरणवादी संस्था संघटनांच्यावतीनं करण्यात येत आहे.
होळी अर्थात हुताशनी फाल्गुन पौर्णिमा – शिमगा हा सण साजरा होत आहे. आज संध्याकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन केलं गेलं आहे. वाईट गोष्टींचा नाश करुन चांगल्याचा विजयी प्रकाश यानिमित्तानं सर्वत्र पोहचवणं असा या सणाचा उद्देश आहे. यानंतर उद्या रंगांची उधळण असणारा, वसंत ऋतुचं जल्लोषपूर्ण स्वागत करणारा सण अर्थात धुलिवंदनाचा उत्सव उद्या देशभरात साजरा होणार आहे.
खरेदीसाठी बाजार फुलला
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सध्या सुरु आहे. या एकंदर सणांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यालगत आलेल्या सुट्ट्यांच्या अनुषंगानं सर्वच ठिकाणी विविध खरेदीसाठी बाजार फुलला असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.