सामान्य माणसांची इच्छा आहे भाजपाचे सरकार उलथण्याची : डॉ. नरेंद्र काळे

लोकसभेचा उमेदवार निष्ठावंत असला पाहिजे : अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सहविचार बैठक

बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम AM : भाजपाच्या विरोधात जनलाट तयार झाली असून गावागावात शेतकरी भाजपाच्या धोरणाला कंटाळले आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांद्याचे भाव पडले आहेत, दुधाला भाव नाही. पिकांच्या अनुदानाचा प्रश्न आहे‌. जिल्ह्याचे कृषी मंत्री असताना देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनता आता निवडणूकीची‌ वाट बघतेय‌. सामान्य माणसांची इच्छा आहे, भाजपाचे सरकार उलथण्याची, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष ‌तथा बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार डॉ. नरेंद्र काळे यांनी केली. यावेळी डॉ.‌ काळे यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.

अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सहविचार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीत डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष ‌तथा बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार डॉ. नरेंद्र काळे बोलत होते. 

यावेळी बोलतांना डॉ. काळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. शिक्षण संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलमध्ये दीर्घकाळ काम केले आणि हा सेल राज्यात वाढविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. कोविड सारख्या काळातही सर्वांना सोबत घेऊन पवार साहेबांच्या आदेशाने काम केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यां असो की विद्यार्थ्यांचे प्रश्न यासाठी झोकून देऊन काम केले. हे सगळं करित असताना कुठेही गुत्तेदारी आणि टक्केवारीसाठी काम केले नाही. उलट पक्षवाढीसाठी स्वताचे पैसे खर्च करून कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ शरद पवारांचा विचार रुजविण्यासाठी मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या विचारांना अनुसरूनच काम चालू आहे.

पुढे बोलताना डॉ. काळे म्हणाले की, आज गावागावांतील तरुणांच्या हाताला काम नाही. शिक्षण घेऊनही त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तरुणांच्या हाताला काम नसल्याने ते दिशाहीन होत वेगळ्या मार्गाला जात आहेत.‌ हे सगळं सुरू असताना राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडण्यात गुंग आहेत. असेही डॉ. काळे म्हणाले. 

बीड लोकसभेच्या निवडणुकीला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक निष्ठेची असून भाजपा बरोबर गेलेल्यांसोबत निवडणूक लढवायची असेल तर उमेदवार ही निष्ठावान असणं गरजेचं आहे. आज‌ सामान्य लोकं विद्यमान सरकारवर नाराज आहेत. मराठा समाज, धनगर समाज आम्हाला सरकारने फसवलयं म्हणतोय. त्यामुळे जिल्ह्यातील जनता प्रस्थापितांच्या विरोधात आहे. परंतू, सामान्य माणूस शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. भाजपाला संविधान बदलायचे आहे. जर भाजपाच्या विरोधात लढायचे आहे तर जो कधीच भाजपात गेला नाही अशा माणसाला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही यावेळी डॉ. नरेंद्र काळे यांनी केली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यासह आदींची समयोचित भाषणे झाली. 

अंबाजोगाई शहरात आज दिनांक 23 मार्चला हॉटेल ‘इट ॲन्ड स्टे’ मध्ये पार पडलेल्या बैठकीला माजी आमदार पृथ्वीराज साठे, केज विधानसभा अध्यक्ष सुरेश तात्या पाटील, प्रदेश सरचिटणीस बन्सी आण्णा जोगदंड, प्रदेश सरचिटणीस व्यंकटेश चामनर, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख, केज तालुकाध्यक्ष शंकर जाधव, ॲड. शहाजहान पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

सहविचार बैठकीत खालील ठराव सर्वानुमते पास

ठराव 1 : बीड हा आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. सद्याच्या येऊ घातलेल्या बीड लोकसभा व केज विधानसभा मतदार संघासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रस पार्टी शरदचंद्र पवार’ या पक्षाच्या वतीने खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांशी व पक्षाप्रति निष्ठा असलेल्या निष्ठावंत व अनेक वर्षापासून आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांसोबत पक्षात, संघटनेत योगदान देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांलाच पक्षाने उमेदवारी द्यावी.

ठराव 2 : केज व अंबाजोगाई तालुक्यातील पक्ष पदाधिकारी निवडी काही दिवसांपुर्वोच झाल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्यांचा कालावधी संपल्याखेरीज त्यांना पदापासून दुर करण्यात येऊ नये.