राज्यात उन्हाचा चटका वाढणार : पुढील चार दिवस काळजीचे

टीम AM : राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे असल्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात गेल्या दोन-तीन दिवस वादळी वारे आणि गारपीटीमुळे गारवा जाणवत होता. परंतु, आता अनेक भागात पाऊत थांबला असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांना पुढील चार दिवस कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे.

स्वत:ची काळजी घ्यावी

राज्यात गेल्यावर्षी अनेकजण उष्णघाताचे बळी ठरले आहेत. यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे आणि तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध आल्याने उष्णघात होऊ शकतो.