बॉलिवूडची ‘खंडाला’ गर्ल : ‘या’ चित्रपटापासून झाली होती राणीच्या करिअरची सुरुवात

टीम AM : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जी हिची गणना बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी एका बंगाली कुटुंबात झाला. मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातच राणीचा जन्म झाला. त्यामुळे तिला देखील अभिनयाची आवड निर्माण झाली.

राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी दिग्दर्शक होते. तर, आई कृष्णा मुखर्जी गायिका होत्या. राणी मुखर्जीने 1996 मध्ये ‘बियेर फूल’ या बंगाली चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचे वडील राम मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर राणी बॉलिवूडकडे वळली. 1996 मध्येच राणीला ‘राजा की आयेगी बारात’ या बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. यानंतर राणीला आमिर खानसोबत ‘गुलाम’ चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ या गाण्याने राणी मुखर्जी ‘खंडाला गर्ल’ म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती. यासोबतच या चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

याच वर्षी राणी मुखर्जीचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘कुछ कुछ होता है’. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर राणीचे फिल्मी करिअर खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे. यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘नायक: द रियल हीरो’, ‘साथिया’, ‘चलते चलते’, ‘हम तुम’, ‘वीर-जारा’, ‘युवा’, ‘ब्लॅक’, ‘बंटी और बबली’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘मर्दानी’, ‘हिचकी’ हे तिचे चित्रपट विशेष गाजले.

चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच राणी सामाजिक कार्यातही सक्रिय असते. राणी मुखर्जीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली होती. 21 एप्रिल 2014 रोजी दोघांनी लग्न केले. राणी आणि आदित्य यांना आदिरा नावाची मुलगी आहे. राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.