लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर : बीड जिल्ह्यात 13 मे ला मतदान 

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक : आचारसंहिता लागू

टीम AM : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्यात देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल मंगळवार 4 जून 2024 रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान, बीड जिल्ह्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यासोबतच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केले आहे.

देशभरात ‘या’ तारखेला होणार मतदान

पहिला टप्पा – 19 एप्रिल 2024
दुसरा टप्पा – 26 एप्रिल 2024
तिसरा टप्पा – 7 मे 2024
चौथा टप्पा – 13 मे 2024
पाचवा टप्पा – 20 मे 2024
सहावा टप्पा – 25 मे 2024
सातवा टप्पा – 1 जून 2024
निकाल – 4 जून 2024

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदीया, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ