टीम AM : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन असा पेहराव करावा.
शिक्षकांनी जीन्स आणि टी – शर्टचा वापर करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ‘ड्रेस कोड’ ठरवावा, असे राज्य सरकारने सांगितले आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश काढला आहे.
हा निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांसाठी लागू असणार आहे.
शिक्षकांच्या नावापूर्वी लागणार ‘टी’
डॉक्टरांच्या नावापुढे ‘डॉ.’ किंवा वकिलांच्या नावापुढे ‘ॲड.’ असे लावले जाते. त्याप्रमाणे आता राज्यातील शिक्षकांच्या नावापुढे ‘टी’ असे संबोधन लावण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत ‘Tr.’ तर मराठी भाषेत ‘टी’ असे संबोधन लावण्याची सूचना राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे दिली आहे. तसेच या संदर्भातील शिक्षण आयुक्तांमार्फत बोधचिन्ह निश्चित करण्यात येणार आहे. हे संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर लावता येणार आहे.