टीम AM : मागील अनेक वर्षापासून ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवाचे विजेतेपद जिंकण्याची परंपरा मुंबई विद्यापीठाने अबाधित राखली. तर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाने अनपेक्षितपणे पुणे विद्यापीठाला मागे टाकून उपविजेतेपदी मुसंडी मारली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ (दि.15) नाटयगृहात झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय फुलारी होते. प्रकुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, अॅड. दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. तर संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. प्रेषित रुद्रवार व डॉ. समाधान इंगळे यांनी केले. 20 वा ‘इंद्रधनुष्य’ महोत्सव 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे होणार आहे.
कलेला सामाजिक कार्याची जोड द्या : सोनाली कुलकर्णी
समाज माध्यमांसह परंपरागत माध्यमातील कलावंतांना आज चांगले दिवस आले आहेत. आजुबाजुला असलेल्या माणसांकडून प्रेरणा घेऊन उत्तम कलावंत व्हा. तसेच कलेला सामाजिक कार्याची जोड द्या, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दिला.
मराठवाडा पाहुण्यांना आपुलकीची वागणूक देतो, याचा प्रत्यय यजमान विद्यापीठाने दाखवून दिल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. सुमारे 25 मिनिटांच्या भाषणात त्यांनी आपल्या जडणघडणीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत रमाबाई आंबेडकर व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या भूमिका आपणास माती आणि समाजाशी नाळ कायम ठेऊन गेल्याचेही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.