टीम AM : धारावीच्या झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा झालेल्या उमेश किलू नावाच्या तरुणाने अनेक अडचणींवर मात करत तसेच मोठ्या कष्टाने भारतीय सैन्य दलात कमिशन्ड ऑफिसर पद मिळवले आहे. लेफ्टनंट उमेश किलू यांचा पासिंग आउट परेड चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत शनिवारी पार पडला.
पीआर डिफेन्स मुंबई यांनी सोशल मीडिया एक्स वर लेफ्टनंट कीलूच्या यशाचे कौतुक करत त्याचा परेडमधील एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये लिहिले आहे की, भेटा लेफ्टनंट उमेश कीलू यांना, त्यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत अतिशय खडतर परिसरात लहानाचे मोठे होत, भारतीय लष्करात अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. त्याने अनेक संकटांवर मात करत हे यश मिळवले आहे.
उमेश किलू मुंबईतील सायन कोळीवाडा झोपडपट्टी परिसरात वाढला. तो कुटूंबासह 10 बाय 5 फुटांच्या घरात रहात होता. कीलूचे वडील घरात एकटे कमावणारे व्यक्ती होते. ते पेंटींगचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र 2013 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला व कुटूंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले.
अनेक वर्षे प्रयत्न केल्यानंतर उमेश 12 व्या प्रयत्नानंतर सर्विस सिलेक्शन बोर्डाची (Services Selection Board) परीक्षा देऊन प्रतिष्ठित अकादमीत दाखल झाला. मात्र, तो अकादमीत दाखल होताच त्याच्या आजारी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तो मुंबईत परतला व वडिलांवर अंत्यसंस्कार करून पुन्हा चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत दाखल झाला. त्याने आपल्या आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊन खडतर प्रशिक्षण पूर्ण केले व भारतीय लष्करात अधिकारी बनला.
आर्थिक तसेच अन्य समस्यांचा सामना करत कीलूने माहिती तंत्रज्ञान विषयात बी.एस्सी पदवी घेतली. त्यानंतर कम्प्युटर सायन्समधून मास्टर डिग्री पूर्ण केली. शिक्षण घेत असताना तो एनसीसी एअर विंगमध्ये त्याने सेवा करत सी सर्टिफिकेट मिळवली होती.
कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने सायबर कॅफेत कम्प्युटर ऑपरेटरचा पार्ट – टाईम जॉब केला होता. त्यानंतर उमेशने टाटा कन्सलटन्सी सर्विसेसमध्ये नोकरी करत कुटूंबाचा आर्थिक भार उचलला. मात्र त्याचा पगार कुटूंबाच्या गरजा भागवताना व वडिलांच्या उपचारासाठी कमी पडत होता. त्याचबरोबर कीलूने आई – वडिलांचे त्याला वर्दीत पाहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागला. त्याला विश्वास होता की, सशस्त्र दलातील करिअर विविध खेळांमध्ये खेळण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या संधींमुळे सर्वांगीण विकास साधण्याची सर्वोत्तम संधी असेल.