दहाव्या वर्षापासून गाणं शिकायला केली सुरुवात : गर्लफ्रेंड सोबत लग्न, आदर्श शिंदेंच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का ? वाचा… 

टीम AM : सुप्रसिद्ध पार्श्वगायक आदर्श शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 7 मार्च 1988 साली झाला. आदर्श शिंदे हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोकगीते व चित्रपट गीतेही गायली आहेत. आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत.

आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले आहेत. आदर्श शिंदे यांनी वडिल आनंद आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले. 

2014 मध्ये ‘शिंदे’ कुटुंबाने ‘प्रियतमा’ या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती. आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. ‘दुनियादारी’ चित्रपटामधील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ आणि ‘ख्वाडा’ चित्रपटातील ‘गाणं वाजू द्या’ या गीताने शिंदेला मोठी लोकप्रियता मिळाली. 

‘प्रियतमा’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बाजी’, ‘दगडी चाळ’, ‘वायझेड’, ‘हलाल’, ‘रिंगण’ आदी चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले आहे. विविध रियॅलिटी शोमध्ये परीक्षक तसेच सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आदर्श शिंदेनीं गर्लफ्रेंड नेहा लेले सोबत लग्न केले आहे. आदर्शची पत्नी नेहा सुद्धा गायिका आहे. आदर्श आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी ‘शिंदे शाही’ नावाने स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरु केला आहे. यातून ते प्रेक्षकांसाठी अनेक सुरेख मैफिली सजवत असतात. आदर्श शिंदेनां वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

शब्दांकन : संजीव वेलणकर