टीम AM : गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येताना दिसत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता एक नवा कोरा आणि मजेशीर चित्रपट ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटात काही तरी मजेशीर कथा पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशीतले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’ भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.
‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की! सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे, मात्र ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 29 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.