टीम AM : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून 17 हजार पोलिस शिपाई पदांसाठीच्या भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे, आज मंगळवार 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन पद्धतीन अर्ज करता येणार आहे.
पोलिस भरती बाबत असलेली माहिती policerecruitment2024.mahait.org व https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 मार्चपर्यंत असणार आहे.
गेल्या काही दिवसापासून पोलिस भरतीची मागणी राज्यभरातून सुरू आहे. दरम्यान, आता राज्य सरकारने पोलिस भरतीबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. मागील काही वर्षापासून राज्यात मोठी पोलिस भरती झालेली नाही. आता 17 हजार पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
‘या’ पदांसाठी भरती
पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रकिया होणार आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज करु शकता, अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च आहे.
अर्जासाठी शुल्क
पोलिस भरतीच्या अर्जासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क आहेत , तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे.
भरती प्रक्रिया कशी असेल ?
आजपासून सुरू होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येईल.