महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या शिष्टमंडळासोबत दीड तास चर्चा
टीम AM : परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी,तसेच परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील व प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्याध्यक्षा डॉ. मनिषा शिंदे, राज्य उपाध्यक्ष भिमराव चक्रे, राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्य खजिनदार राम सुर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य आशा यादव, सेंट जॉर्ज शाखेच्या अध्यक्षा कामिनी सोनवणे, स्मिता म्हसकर आदींची उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेच, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्ता, गणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले. याचबरोबर राज्यभरातून मुंबईत कामकाजास्तव येणाऱ्या परिचारिकांसाठी मुंबईतील रुग्णालयांमध्ये रुम उपलब्ध करुन देण्याबाबत यावी. अंबाजोगाई येथील विद्यार्थी परिचारिकांना विद्यावेतन दिले जात नाही, ते वेळेवर देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मंत्री महोदयांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली
मागील महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी लवकरच बैठक बोलावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने काल मंत्रालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली व सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी मंत्री महोदयांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली.
आशा यादव
[ राज्य कार्यकारिणी सदस्य तथा शाखाध्यक्षा, ‘स्वाराती’ रुग्णालय, अंबाजोगाई ]