टीम AM : केज मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या मागासवर्गीयांच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अंबाजोगाईतील मागासवर्गीय वस्त्यांमधील महिला घरकुल आणि भोगवट्याच्या प्रश्नावर लढा देत असून आ. मुंदडांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवत साधी विचारपूस देखील केलेली नाही. मागासवर्गीयांच्या प्रश्नाबाबत त्यांना सहानुभूती नसेल तर मागासवर्गीय आमदार काय कामाच्या ? अशी भावना उपस्थित आंदोलनातील महिलांनी आणि आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनात जातीअंत संघर्ष समितीचे कॉ. बब्रुवान पोटभरे आणि विनोद शिंदे यांनी आमदारांच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत नगरपरिषद प्रशासनावर जोरदार टीका केली.
नगरपरिषद प्रशासनाने अंबाजोगाई शहरातील झोपडपट्टी भागात सरसगट आवास योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयावर जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अंबाजोगाई शहरातील बहुतांश वस्त्यांमधील सर्व समाजातील समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरात गेल्या काही वर्षांपासून आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे. परंतू, गोरगरिबांच्या या प्रश्नाकडे नगरपरिषदेची भूमिका नकारात्मक असून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत नाही. नगरपरिषदेने सर्व समाजासाठी आवास योजनेची अंमलबजावणी करावी, वसुलीच्या नावे चालू केलेली अघोरी मोहीम बंद करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सदरील मागण्या मान्य नाही केल्यास तीव्र ‘आक्रोश’ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
‘या’ आहेत मागण्या
◾ अंबाजोगाई शहरातील सर्व बेघर लोकांचा सर्वे करा.
◾ पारधी वस्तीतील पिडीतांचे पुर्नवसन करा.
◾ सर्व झोपडपट्टी भागात आवास योजना राबवा.
◾ सनातनी कॉर्पोरेट केंद्रीय सत्तेने मतदान प्रक्रियेतून ‘इव्हीएम’ कायमचे हटवले पाहिजे.
◾आधी घरकूल योजना राबवा, नंतर सर्व कर वसूल करा,
◾ क्रांती नगर भागात स्वतंत्र रेशन दुकान द्या.
◾ किसान आंदोलनावर होत असलेली दडपशाही बंद करा.
◾मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जातीअंत संघर्ष समितीच्या निवेदनावर कॉ. बब्रुवान पोटभरे, विनोद शिंदे, भागवत जाधव, बाबा शेख, गुलनाज पठाण, राजाराम कुसळे, अशोक सोनवणे, राजुलाला शेख, शेख इकबाल, महेबूब लाला शेख, अनिल ओव्हाळ, अविनाश कुऱ्हाडे, अशोक ढवारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.