टीम AM : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 22 फेब्रुवारी 1994 रोजी नागपूर येथे जन्मलेली केतकी माटेगावकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात गायिका म्हणून केली. ‘सारेगामापा’ लिटील चॅम्पसमध्ये केतकीने तिच्या गायकीने सर्वाचे मन जिंकून घेतले होते. केतकीचा आवाज जसा गोड तसेच ती दिसतेही सुंदर त्यामुळे तिला चित्रपटाच्या ऑफर्सही येऊ लागल्या आणि तिने साईन केला तिचा पहिला चित्रपट ‘शाळा’..
‘शाळा’ या चित्रपटात केतकीने नऊ वर्षाच्या मुला – मुलीचे शाळकरी प्रेम सुंदररित्या पडद्यावर उतरवले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अंशुमन जोशी या कलाकाराने भूमिका केली होती. त्यानंतर केतकीने ‘काकस्पर्श’, ‘टाईमपास’, ‘फुंतरु’ यांसारख्या चित्रपटातही काम केले. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणारी केतकी जेव्हा मॉर्डन रुपात प्रेक्षकांसमोर आली तेव्हाही तिला प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळाले.
केतकीने अनेक चित्रपटात पार्श्वगायनही केले आहे. तिच्या स्वतःच्या सर्व चित्रपटातील स्वतः ची गीते तिनेच गायली आहेत. याशिवाय काही हिंदी व काही मराठी चित्रपटातही तिने आपला स्वर दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओच्या ‘पांघरूण’ या चित्रपटात केतकीने गाणी गायली आहेत. तसेच काही काळापूर्वी केतकी माटेगावकरने संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केतकीने संगीत दिग्दर्शन केलेला ‘माई’ हा अल्बम रसिकांच्या भेटीला आला आहे.
‘माई’ या अल्बममध्ये सुरेश वाडकर, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, पं. रघुनंदन पणशीकर, सुवर्णा माटेगांवकर यांनी गायन केलं आहे. ‘आरोही’ या चित्रपटाकरिता मिरची म्युझिक अवॉर्ड्समध्ये ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ या गीता करिता ‘बेस्ट फिमेल’ सिंगरचे अवॉर्ड तिला मिळाले. ‘टाइमपास’ या चित्रपटातील ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गीता करिता सर्वोत्कृष्ट गायिकेचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही केतकीला मिळाला आहे. ‘अवघा रंग एकची झाला’ या संगीत नाटकात केतकीला पंतांचे म्हणजेच प्रभाकर पणशीकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. केतकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.