घाटनांदूरमध्ये थाटात पार पडला ‘शिवजन्मोत्सव’ सोहळा : दैदिप्यमान शोभायात्रेने वेधले लक्ष

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला. गेल्या सहा वर्षांपासून घाटनांदूर येथे उत्सव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक ‘शिवजन्मोत्सव’ साजरा केला जात आहे. दरवर्षी ‘डीजे’ मुक्त शिवजयंती, दारू मुक्त शिवजयंती साजरी केली जात असल्याने उत्सव जाधव यांचे घाटनांदूर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. 

सार्वजनिक ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर मोफत मोतीबिंदू तपासणी आणि माफक दरात शस्त्रक्रिया शिबिराचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्याच्या शोभायात्रेत वाशीम येथील जय बजरंग ढोल – ताशा पथक आणि अहमदनगर येथील शिवशंभो मर्दानी आखाडाच्या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.

ढोल – ताशा पथकातील 60 कलाकारांनी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात आपली कला सादर केली आणि शिवप्रेमींची मने जिंकली. तसेच शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या कलाकारांनी शिवकालीन तलवारबाजी, दांडपट्टा फिरवणे, काठी फिरवणे अशी चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. शोभायात्रेत राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांचे जीवंत देखावे, घोडे, उंट आणि मेघडंबरीमध्ये सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची भव्यदिव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात पार पडली. ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्याचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक ‘शिवजन्मोत्सव’ समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.