टीम AM : उद्यापासून राज्यात 12 वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. त्याआधी आज पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगाने बोर्डाकडून महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षेसंदर्भात काही घोषणा करण्यात आल्या आहेत. उद्यापासून 12 वीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेसाठी एकुण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना 10 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सकाळच्या सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी 2.30 पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थितीत असला पाहिजे. प्रचलित पद्धती प्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. या विषयासाठी 1,94,439 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.
ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कॅल्क्युलेटर, मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केले आहे.