टीम AM : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक 19 फेब्रुवारी सोमवार रोजी अंबाजोगाई शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून निघालेली भव्य मिरवणूक व मिरवणुकीतील पारंपारिक लोककला, पारंपारिक वाद्य आणि डिजे या सर्व प्रकारांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सकाळी चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. ध्वजारोहण व मानवंदना या कार्यक्रमास ॲड. शोभा सुनिल लोमटे, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्यासह सामाजिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शिवशाहीर मामा काळे व शहरातील स्थानिक कलावंतांनी पोवाड्याचे सादरीकरण केले.
शिवजन्मोत्सवाच्या या दिमाखदार सोहळ्यात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अण्णा भोसले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाविद्यालयीन विद्यार्थीं – विद्यार्थिनी, महीला, बालकांची, युवकांची लक्षवेधी उपस्थिती होती. डीजेच्या आणि ढोल – ताशांच्या तालावर तरुणाई ठेका धरत जल्लोष करताना दिसून येत होती. शहरातील काणाकोपऱ्यातुन हजारो शिवभक्त शिवजयंतीत सहभागी झाले होते, या मिरवणुकीत जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी शहर दुमदुमले होते, शिवभक्तांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
मिरवणुकीचे मुख्य आकर्षण
अंबाजोगाई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घोडे, उंट, विविध ढोलपथक, हलगी पथक, शिवकालीन पारंपारिक दांडपट्टे पथक, वासुदेव, आराधी – गोंधळी, वारकरी, बालकांच्या वेशातील शिवबा, जिजाऊ आणि फटाक्यांची आतिषबाजी शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.