गुडबाय डियर कविता.. ‘उडान’ भरते रहेना !

टीम AM : मी अगदी 7 – 8 वर्षांची असेन. जरा जरा दुनिया समजायला लागलेली. पाहिलेल्या गोष्टी आठवणीत ठेवता येण्याजोगे वय.. काहीच वर्षांपूर्वी आमच्याकडे पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाइट टिव्ही आणला होता. त्यामुळे त्यावर लागणाऱ्या तुरळक मालिका बघायची ओढ असायची. रोज वेगवेगळ्या. एक मालिका आठवड्यातून एकदाच लागत. नुककड, परंपरा, एक शून्य शून्य आणि बऱ्याच मालिका आई बाबांना आवडायच्या. पण त्याही वयात माझं आकर्षण खेचून घेणारी मालिका लागली होती ती ‘उडान’ ही मालिका. शेतातून धावणारी एक चिमुकली (तेव्हाच्या माझ्या वयाची) मुलगी.. जी पिंजऱ्यातून एका पोपटाला मोकळं करते आणि वर आकाशात उडत जाणाऱ्या त्या पोपटाकडे अनंत आकांक्षा डोळ्यात घेऊन बघत राहते. जणू स्वतःला पंख फुटल्याचे भरारी घेण्याचे फील करते. माझ्या त्या वयात मलाही हे बघताना मनात काहीतरी होत असे. ते काय हे समजण्याचे मात्र ते वय नव्हते. मात्र आपणही एक दिवस अशी पोलिसाची वर्दी घालून, वाईटावर प्रहार करू हे स्वप्न मात्र पडू लागले होते. 

1989 मध्ये दूरदर्शनवरील या मालिकेचा भारतातील तरुण मुलींवर इतका प्रभाव पडला की, केवळ लग्न आणि नवरा अशी स्वप्ने पाहणाऱ्या या मुली आयुष्यात काहीतरी बनण्याची स्वप्ने पाहू लागल्या! ‘उडान’ मालिकेची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत गेली. 

1989 -1991 पर्यंत चाललेली ही मालिका देशातील दुसरी महिला आयपीएस अधिकारी कांचन चौधरी – भट्टाचार्य यांच्या जीवनावरून प्रेरित होती आणि त्यात मुख्य भूमिका साकारली होती – अभिनेत्री कविता चौधरी ह्यांनी. कविता यापूर्वी ‘सर्फ एक्सेल’ च्या जाहिरातीत ललिताजी म्हणून प्रसिद्ध झाली होती.

पण, ‘उडान’ या मालिकेत तिने एका सामान्य कुटुंबातील मुलीचा आयपीएस अधिकारी होण्याचा प्रवास इतक्या तीव्रतेने सक्षमपणे साकारला की तिच्या अभिनयाची सर्वांना खात्री पटली आणि सर्वत्र कौतुकही झाले. कविताने ‘उडान’ मध्ये आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे आयपीएस कांचन चौधरी, कविता यांची मोठी बहीण होती.

कविता यांनी या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शनही केले होते. ‘उडान’ नंतर कविता महिला सक्षमीकरणाचे उदाहरण ठरली. हा तो काळ होता जेव्हा चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये महिलांना घरगुती भूमिकांमध्ये दाखवले जात असे. पण कविताने ‘युअर ऑनर’ आणि ‘आयपीएस डायरी’ सारखे शो देखील केले, ज्यात महिलांना सशक्त भूमिकेत दाखवले होते. 

16 फेब्रुवारी 2024 रोजी या अभिनेत्रीने वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांनी दिलेली प्रेरणा देशातील करोडो मुलींच्या हृदयात जिवंत आहे. 

– रश्मी माडनकर