टीम AM : हिंदी चित्रपटसृष्टीत 60 च्या दशकात नूतन या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. नूतन यांनी जवळपास 40 वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. त्यांनी आपल्या या प्रावासात 70 पेक्षा अधिक चित्रपटात काम करत चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. चाहत्यांना वेड लावणार्या या अभिनेत्रीचा जन्म 4 जून 1936 रोजी चित्रपट सृष्टीशी संबंधित मुंबईतील एका प्रसिद्ध कुटुंबात झाला होता. नूतन यांची आई शोभना समर्थ ह्या नावाजलेल्या अभिनेत्री तर वडील कुमार सेन समर्थ हे दिग्दर्शक होते. नूतन यांचे शिक्षण विदेशात झाले होते. नूतन यांनी 1950 मध्ये ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
14 व्या वर्षी मिळाली होती चित्रपटाची ऑफर
नूतन यांचे वडील कुमार सेन समर्थ हे दिग्दर्शक होते. नूतन यांनी 1945 मध्ये ‘नल दमयंती’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांना ‘मुघल – ए- आजम’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यावेळी त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
ऑनस्क्रीन ‘स्विमसूट’ घालणारी पहिली अभिनेत्री
अभिनेत्री नूतन यांनी 1958 मध्ये ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटात ऑनस्क्रीन ‘स्विमसूट’ घातला होता. या चित्रपटात त्यांनी स्विमिंग आणि डायव्हिंग चॅम्पियन म्हणून भूमिका साकारली होती. त्यावेळेस ऑनस्क्रीन ‘स्विमसूट’ घालणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या नूतन यांनी 5 वेळा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार पटकावला आहे. तीस वर्षापर्यंत हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. नूतन यांच्या अभिनयाचे इतके वर्चस्व होते की, लग्नानंतरही निर्माते त्यांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास तयार होते. एवढेच नव्हे तर अभिनेत्याच्या बरोबरीचे पात्र त्यांना मिळत होते.
संजीव कुमारच्या लगावली कानशिलात
1969 मध्ये नूतन जेव्हा ‘देवी’ चित्रपटात संजीव कुमार यांच्यासोबत काम करत होत्या. तेव्हा दोघांची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा होऊ लागली. मैत्रीला अफेअरचे नाव मिळाल्याने नूतन संतापल्या होत्या. अशात एकदा शुटिंगमधून फ्री झाल्यानंतर मासिक वाचत असताना त्यात नूतन आणि संजीव यांच्या अफेअरबाबत मजकूर छापून आला होता. ही गोष्ट सहन न झाल्याने नूतनने संजीवकडे जात थेट संजीव यांच्या कानशिलात लगावली होती.
स्तनाचा कर्करोग
1990 मध्ये नूतन यांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. कर्करोग झाल्याचे कळाल्यानंतर देखील नूतन काम करत राहिल्या. काही महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी 1991 मध्ये प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना 21 फेब्रुवारी रोजी त्यांचं निधन झालं, त्यांना भावपूर्ण आदरांजली.