मराठा आरक्षण : सर्वेक्षण अहवाल सुपूर्द, आपला कुठलाही विरोध नाही : छगन भुजबळ

टीम AM : मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आयोगाचे सदस्य उपस्थित होते. हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी मांडण्यात येईल, तसंच या करता येत्या 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपला कुठलाही विरोध नाही : छगन भुजबळ

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपला कुठलाही विरोध नाही, मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, असं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शुक्रे समितीने 15 दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचं सर्वेक्षण केलं, जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचं सर्वेक्षण देखील पूर्ण करून घेण्यात यावं, अशी मागणी भुजबळ यांनी केली.