टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात ठिकठिकाणी देशाचा 75 वा ‘प्रजासत्ताक’ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके उपस्थित होत्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना उपजिल्हाधिकारी शरद झाडके आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अंबाजोगाई नगरपरिषदेतही मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. अंबाजोगाई पंचायत समितीच्या प्रांगणातही गटविकास अधिकारी स्मृती दिवाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालयात ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला
अंबाजोगाई शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था याही ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच देशभक्तीपर गायन, नृत्याचे सादरीकरणही शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यात आले. देशाचा ‘प्रजासत्ताक’ दिन मोठ्या उत्साहात अंबाजोगाई पंचक्रोशीत साजरा करण्यात आला.