टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 17 वे कुलगुरु म्हणून डॉ. विजय जनार्धन फुलारी यांनी बुधवारी (दि. 24) सायंकाळी सुत्रे स्विकारली. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलगुरु कक्षात त्यांना पदभार दिला. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विजय फुलारी यांची मंगळवारी सायंकाळी कुलगुरुपदी नियुक्ती केली होती.
कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांचा अल्पपरिचय
डॉ. विजय जनार्धन फुलारी हे गेल्या 36 वर्षांपासून अध्यापन संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठात पदार्थविज्ञान विभागात प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच युसिक व सिएफसी विभाग प्रमुखपदही त्यांनी भुषविले आहे. बीएस्सी, एमएस्सी व पीएच.डी. हे पदार्थ विज्ञान विषयात त्यांनी मिळविली आहे. डॉ. फुलारी यांना आजपर्यंत चार पेट्सं प्राप्त झाले असून 150 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली असून 165 राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. आजपर्यंत पाच विद्यापीठांच्या कुलगुरुपदासाठी ते शॉर्टलिस्ट झाले आहेत. अभ्यास मंडळ, परीक्षा मंडळ यासह विविध अधिकार मंडळावर त्यांनी कार्य केले आहे.