ॲड. अण्णाराव पाटील, याचिकाकर्ते असिफोद्दीन बाबा खतीब, अभिजीत लोमटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
टीम AM : अंबाजोगाई जिल्हा निर्मिती व्हावी, ही अंबाजोगाईकरांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. यासाठी अंबाजोगाई जिल्हा कृती समिती व अंबाजोगाईकरांच्या वतीने अनेक आंदोलने झाली. मात्र, राजकीय इच्छाशक्ती अभावी अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न रखडला आहे. यामुळे अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते असेफोद्दीन बाबा खतीब, अभिजीत लोमटे यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने निकाली काढली असून आता लवकरच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या हालचालींना वेग येणार आहे.
अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर या याचिकेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला ॲड. अण्णाराव पाटील, याचिकाकर्ते असिफोद्दीन बाबा खतीब, अभिजीत लोमटे, चंद्रकांत हजारे यांची उपस्थिती होती.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, उच्च न्यायालयातील (खंडपीठ औरंगाबाद) याचिका नंबर 50/2024 नुसार औरंगाबाद उच्च न्यायालयाने अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी जिल्हा कृती समितीने दिनांक 6/1/ 2009 पासून केलेली विनंती व त्यानुसार जिल्हाधिकारी बीड, विभागीय आयुक्त यांनी दिलेला अहवाल तत्वतः मान्य करून आणि याचिकेतील विनंतीला अनुसरून संबंधित अंबाजोगाई जिल्हा कृती समितीने केलेली जिल्हा निर्मितीची मागणी ही सर्व भौतिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व नागरी सुखसुविधा देण्यास शासन असमर्थ असल्याने उच्च न्यायालयाने अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करून अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीची प्रश्न मार्गी लावावा, अशा प्रकारचा आदेश दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पारित केला.
त्याप्रमाणे याचिकाकर्ते मोहम्मद असिफोद्दीन खतीब, अभिजीत लोमटे यांनी मुख्य सचिव – महाराष्ट्र शासन, सचिव – महसूल, वन विभाग व सामान्य प्रशासन यांच्याकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती लवकरात लवकर करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रियेंद्राजी सोनटक्के (पाटील) व ॲड. गजेंद्र सोनटक्के यांनी काम पाहिले.