टीम AM : उखाणे, गीत, संगीताने जिल्हाधिकारी कार्यालयाचे वातावरण काही काळापुरते बदलले. या बदलाचे निमित्त ‘संक्रांत’ मिलन ठरले. मकर ‘संक्रांत’ हा भौगोलिक आणि नैसर्गिक बदलांचा महत्त्वाचा सण भारतीय परंपरेत साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आहे. महिला एकत्रित येऊन वेगवेगळे खेळ, गीत, संगीताचा कार्यक्रम आयोजित करतात.
असाच कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आला. विविध विभागातील महिला, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘संक्रांत’ मिलन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या उपस्थितीत साजरा केला.
सुरुवातीला मॉं जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या अनौपचारिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी मधुर आवाजात गीत सादर केले. या गीताला उपस्थित महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांची दाद दिली. उपस्थित नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, उपजिल्हाधिकारी कविता जाधव, भारती सागरे, तहसीलदार श्रीमती वराळे, नायब तहसीलदार श्रीमती उगलमुगले यांनी देखील गीतांचे सादरीकरण केले. या अनौपचारिक कार्यक्रमानिमित्त सर्वांचा परिचय झाला आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.