पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राची पायाभरणी

‘एफएम’ साठी 9 कोटी 65 लाखांची तरतूद

‘गावकरी’, ‘अंबाजोगाई मिरर’ च्या माध्यमातून सातत्याने केला होता पाठपुरावा

टीम AM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांयकाळी अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी केली. हे ‘एफएम’ केंद्र 10 किलो वॅटचे आहे. अंबाजोगाई ‘एफएम’ केंद्र जवळपास 100 किलोमीटर अंतरावर सेवा पुरवणार आहे. अंबाजोगाई उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून ‘एफएम’ ची सेवा सुरू होण्यासाठी ‘गावकरी’, ‘अंबाजोगाई मिरर’ च्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. अगदी काही दिवसांपूर्वीच यासाठी पुढाकार घेऊन पत्रकारांच्या वतीने खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनीही यासाठी पुढाकार घेत वेळोवेळी प्रयत्न केले होते.

अंबाजोगाई येथील आकाशवाणी ‘एफएम’ प्रसारण केंद्राच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला दूरदृश्य  प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, डाॅ. एल. मुरगम तर अंबाजोगाई येथील कार्यक्रमात आ. नमिता मुंदडा, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, आकाशवाणी केंद्र, पुणे येथील अनिल पाटील, मनोज शहा, लक्ष्मीकांत भालेराव यांच्यासह पत्रकार बांधव, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

केंद्रातील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देशातील 14 राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक 41 फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता देण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्राचा समावेश आहे. ‘एफएम’ केंद्र सुरू करण्यासाठी 9 काेटी 62 लाख रुपयांच्या निधीसह मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रावर 10 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. धायगुडा पिंपळा या ठिकाणी पूर्वीपासूनच दूरदर्शनचा 150 मीटर उंच मनाेरा आहे. इतरही यंत्रणा कार्यान्वित आहे. 

देशातील इतर ठिकाणच्या तुलनेत अंबाजाेगाई केंद्राची क्षमता माेठी असेल. त्यापेक्षा माेठे गुजरातच्या भूजमधील आहे. तेथे 20 किलाे वॅटचे केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. अंबाजोगाई येथील उच्चशक्ती प्रेक्षपण केंद्रावरून लवकरच ‘एफएम’ ची सेवा सुरू होणार असल्याने रेडिओ प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.