टीम AM : प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आज 79 वर्षांचे झाले आहेत. जावेद अख्तर यांचे नाव चित्रपट, कला आणि साहित्य विश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. त्यामागे त्यांची प्रतिभा, ज्ञान आणि मेहनत आहे. संघर्षाच्या खडतर टप्प्यातून पुढे जाऊन त्यांनी आपले नाव कमावले आहे. जावेद यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेर येथे प्रसिद्ध कवी जानिसार अख्तर यांच्या घरी झाला होता. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा मुलगा असूनही जावेद अख्तर यांना इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेकप्रसंगी त्यांना झाडाखाली झोपून रात्र काढावी लागली. जावेद अख्तर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया…
‘कल हो ना हो’, ‘वेक अप सिड’, ‘वीर – झारा’ आणि ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे गीतकार आणि कवी जावेद अख्तर हे सिनेजगतातील एक लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. आज जावेद अख्तर हे स्वतः एक खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, परंतू, ते ज्या कुटुंबातून आलेत त्यांचाही स्वतःचा इतिहास आहे.
जानीसार अख्तर आणि प्रसिद्ध लेखिका साफिया अख्तर यांचे ते चिरंजीव आहेत. प्रसिद्ध कवी मुझतार खैराबादी हे जावेद यांचे आजोबा होते. तर मुझतार यांचे वडील सय्यद अहमद हुसेन हे कवी होते, मुझतार यांची आई हिरमा एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध कवयित्रींपैकी एक होती आणि त्यांचे वडील फझले – एहक खैराबादी हे अरबी कवी होते.
जावेद अख्तर यांनीही त्यांच्या घराण्याची लेखन परंपरा सुरू ठेवली. त्यांनी ग्वाल्हेर, लखनौ, अलीगढ आणि भोपाळ दरम्यान प्रवास सुरू ठेवला. यानंतर मायानगरीत येऊन भरपूर संघर्षातून पुढे जाऊन त्यांनी एक यशस्वी गीतकार आणि पटकथाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. एवढ्या मोठ्या आणि नामवंत घराण्यातून येऊनही त्यांची वाटचाल अवघडच होती.
मिळालेल्या माहितीनुसार जावेद अख्तर यांना मुंबईत आल्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी वडिलांचे घर सोडावे लागले आणि दोन वर्षे ते संघर्ष करत राहिले. दरम्यान, त्यांनी महिन्याला 100 रुपये दरावर संवाद लिहिले आणि इतरही काही ठिकाणी छोटी – मोठी नोकरी केली. एक वेळ तर अशीही आली की त्यांना चणे खाऊन भूक भागवावी लागायची. तसेच पायी सर्वत्र प्रवास करावा लागायचा.
जावेद अख्तर 1964 मध्ये मुंबईत आले होते. मुंबईत दीर्घकाळ ते बेघर माणसासारखे राहिले. जावेद अख्तर यांनी अनेक रात्री झाडाखाली घालवल्या. पुढे त्यांना जोगेश्वरी येथील कमाल अमरोही यांच्या स्टुडिओत राहण्यासाठी जागा मिळाली. त्यांना 1969 मध्ये पहिला यशस्वी ब्रेक मिळाला आणि त्यानंतर त्यांचे दिवस बदलले. जावेद अख्तर यांचे खरे नाव जादू आहे.
त्यांचे वडील जन्नीसार अख्तर यांच्या ‘लम्हा किसी जादू का फसाना होगा’ या कवितेवरुन त्यांचे नाव ठेवले होते. जावेद साहेबांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सलीम खानसोबत त्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. सलीम-जावेद जोडीने जवळपास 25 चित्रपटांसाठी संवाद लिहिले आहेत. पण, काही वैचारिक मतभेदांनंतर ही जोडी वेगळी झाली. यानंतर जावेद यांनी गीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. जावेद अख्तर यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.