‘दंगल गर्ल’ चा वाढदिवस : बालकलाकार म्हणून केली करिअरची सुरुवात

टीम AM : बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’ म्हणून अभिनेत्री फातिमा सना शेख ओळखली जाते. उत्कृ्ष्ट अभिनय, आरसपाणी सौंदर्य आणि परफेक्ट फॅशन सेन्समुळे ती कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून फातिमाचे नाव आमिर खानशी जोडले जात आहे. इतकच काय तर आमिर आणि किरणचा घटस्फोट तिच्यामुळे झाल्याचा देखील म्हटले जात आहे. आज 11 जानेवारी फातिमाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

11 जानेवारी 1992 साली फातिमाचा जन्म मुंबईत झाला. ती इथेच लहानाची मोठी झाली. तिने ‘चाची 420’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘वन टू का फोर’ मध्ये दिसली. त्यानंतर फातिमाला 2009 मध्ये ‘दंगल’ चित्रपटाची ऑफर आली. तिचा हा चित्रपट तुफान हिट ठरला. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फातिमाने कास्टिंग काऊचविषयी सांगितले होते. ‘मला बऱ्याच वेळा ऐकावे लागले की, तू कधीही अभिनेत्री होऊ शकणार नाहीस. तू दीपिका किंवा ऐश्वर्या सारखी दिसत नाहीस. तू अभिनेत्री कशी बनशील ? बरेच लोक तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटते की, हे ठीक आहे. हे लोक सौंदर्याकडे एवढे पाहतात की, अशी ठरावीक दिसणारी मुलगी अभिनेत्री होऊ शकते. त्या श्रेणीत मी बसत नव्हते. मात्र, आता माझ्याकडे अनेक संधी आहेत. माझ्यासारख्या लोकांसाठीही चित्रपट बनवले जातात, जे सामान्य दिसतात, सुपरमॉडल्ससारखे दिसत नाहीत’ असे फातिमा एका मुलाखतीत म्हणाली होती.